शेतमजूर स्त्रियांच्या कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक परिस्थितीचे अध्ययन

" दुसऱ्याच्या मालकीच्या शेतीवर अंगमेहनतीने काम करून जो मजुरी कमवितो तो शेतमजूर" अशी आपण शेतमजुराची व्याख्या करू शकतो. ही मजुरी म्हणजेच मोबदला. हा मोबदला रोख पैशात , वस्तुरूपात अथवा उत्पादनातील हिश्याच्या स्वरुपात असू शकतो.असे शेतमजूर तीन प्रकारचे आढळतात.
(1) भूमिहीन शेतकरी
(2) अल्प भूधारक
(3) अत्यल्प भूधारक

शेतमजूर स्त्रिया
शेतमजूराचे वर्गीकरण केले तरी शेतमजूर पुरुष व स्त्रिया असे विभाजन करता येते. यात पुरुष शेतमजूर यापेक्षा स्त्रि शेतमजुरांना घरची व बाहेरच्या अशी दोन्हीही  परिस्थिती सांभाळावी लागते. त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे अधिक लक्ष द्यावे लागते. घरात बऱ्याच वेळा अनेक समस्या असतात. त्या सर्व समस्या त्यांना भेळसावत असतात. त्या सर्व समस्यांना तोंड देवून त्यांना त्यांचा संसार सांभाळावा लागतो. अनेक वेळा या शेतमजूर स्त्रियांच्या पतीचे निधन झालेले असते. अशा वेळेस त्यांना सर्व कुटुंबाला सोबत घेवून जगावे लागते. घरात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या, आरोग्याच्या ,शैक्षणिक अशा अनेक समस्या असतात. त्या सर्व समस्यांना एकट्या स्त्रीला एकटीला सामोरे जावून सोडवाव्या लागतात. या शेतमजूर स्त्रियां शेतमजूर होण्यामागे अनेक करणे असतात. ग्रामीण भागात उदरनिर्वाहाचे साधन शेती असते. पण बऱ्याच कुटुंबाकडे आवश्यक तेवढी शेती नसते. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात जावून शेतमजुरी करावी लागते. केवळ पतीने कमावून आणलेले उत्पन्न पूर्ण कुटुंबासाठी पर्याप्त नसते. त्यामुळे स्त्रीला शेतमजुरीकडे वळावे लागते. ग्रामीण भागात स्त्रिया शेतमजूर होण्याची  कारणे तसेच त्यांना येणाऱ्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून  येतात.

स्त्री शेतमजूर होण्याची कारणे

 1. गरिबी                                  7.  महागाई
 2. शिक्षणाचा अभाव                     8.  इतर क्षेत्रांचा अभाव
 3. रोजगाराच्या संधी                    9.  पतीला कमी मजुरी
 4. संयुक्त कुटुंब                        10.  पतीचे व्यसन
 5. घरातील सदस्य संख्येत वाढ       11. पतीचा मृत्यू

शेतमजूर स्त्रियांच्या समस्या

 1. समस्यांचे क्षेत्र
 2. कौटुंबिक समस्या
 3. आरोग्य विषयक समस्या
 4. आर्थिक समस्या
 5. सामाजिक समस्या

संशोधन उद्धीष्ट्ये

 1. (i) ग्रामीण भागातील शेतमजूर स्त्रियांचा आढावा घेणे
 2. (ii) शेतमजूर स्त्रियांच्या कौटुंबिक परिस्थितीचे अध्ययन करणे
 3. (iii)  शेतमजूर स्त्रियांच्या आर्थिक  परिस्थितीचे अध्ययन करणे
 4. (iv) शेतमजूर स्त्रियांच्या सामाजिक  परिस्थितीचे अध्ययन करणे
 5. (v) शेतमजूर स्त्रियांच्या समस्या जाणून घेणे

संशोधनाची व्याप्ती
प्रस्तुत संशोधन चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागातील चार गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये बेलोरा, तळवेल , जवळा आणि कुरणखेड या गावातील शेतमजूर स्त्रियांचा  समावेश करण्यात आला आहे. 

संशोधन नमुना -
चांदूर बाजार तालुक्यातील चार गावातील प्रत्येकी एका गावातून दहा याप्रमाणे एकूण ४० महिलांना प्रश्नावली देण्यात आली.

संशोधन साधने -
प्रस्तुत संशोधनासाठी प्रश्नावली या संशोधन साधनाचा उपयोग करण्यात आला.

संशोधन पद्धती
प्रस्तुत संशोधनासाठी स्त्रीवादी संशोधन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे संशोधन करण्यात आले.

निष्कर्ष:
आलेल्या माहितीवरून संशोधनाचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.
(1) शेतमजूर स्त्रियांच्या घरातील कमावत्या लोकांची संख्या ही कमी दिसून आली आहे. त्यामुळे घरातील बराचसा अर्थार्जनाचा भार हा एकट्या शेतमजूर स्त्रीवर पडल्याचे दिसते. तिला घरातील सर्व बाबींकडे लक्ष द्यावे लागते तसेच बाहेर जावून मजूरी  सुद्धा करावी लागते.
(2) या शेतमजूर स्त्रियांना वर्षभरातील जास्तीत जास्त हे शेतात जावून काम करावे लागते तेव्हा थोड्या प्रमाणात का होईना त्यांच्या गरजा भागविल्या जातात. त्यामुळे या स्त्रियांचा जास्त वेळ काम करण्यात जात असल्याने त्या स्वत: कडे जास्त लक्ष देवू शकत नाही.
(3) शेतमजूर स्त्रियांना शेतमालक ज्या दिवशी काम केले त्या दिवशी मजुरी देत नाही, त्यामुळे या शेतमजूर स्त्रियांना रोजच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. एखादी अचानक अडचण उभी राहिल्यास त्यांच्या कडे आवश्यक तेवढा पैसा राहत नाही. तेव्हा त्या अडचणीला सामोरे जाने त्यांना कठीण जाते.
(4) आर्थिक गरजा पूर्ण होत नसल्याने शेतमजूर स्त्रियांना जास्तीतजास्त दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करावी लागते. त्यांचा अधिक वेळ मजुरी करण्यात गेल्या मुळेत्या त्यांच्या कुटुंबातील मुलांमुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देवू शकत नाही.यामुळे या शेतमजूर स्त्रियांच्या मुलांमुलींच्या शिक्षणात बरेच वेळा खंड पडतो.
(5)या शेतमजूर स्त्रियांचे शिक्षण हे प्राथमिक व माध्यमिक पर्यंतच झाल्याचे दिसते.
(6) शेतमजूर स्त्रियांच्या कुटुंबाचा मुख्य व अधिक अर्थार्जनाचा भाग शेतमजुरी करणे हा आहे त्यामुळे त्यांना दुसरा पर्याय नसल्याने दुसऱ्यांच्या शेतात जावून शेतमजुरी करावी लागते.
(7) अधिकाधिक शेतमजूर स्त्रियांकडे शेतमजुरीला धरून जोड व्यवसाय नाही आहे. त्यामुळे केवळ त्यांना मजुरीच्या उत्पन्नावर अवलंबून राहावे लागते.
(8) या शेतमजूर स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या मजुरीचे प्रमाण हे महागाईच्या तुलनेत  बरेच कमी आहे. त्यामुळे या शेतमजूर स्त्रियांच्या आर्थिक गरजा पूर्ण होऊ  शकत नाही.                             
(9) शेतमजूर स्त्रियांना आर्थिक गरज भासल्यास त्या बरेच वेळा सावकाराकडून व्याजाने पैसे घेतात तसेच काही वेळा त्या शेजाऱ्याकडून व शेत मालकाकडून उसनवार म्हणून घ्यावे लागतात. त्यामुळे ते पैसे परत करणे कठीण जाते आणि त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.                                                                                                                
(10) घरातील आर्थिक व्यवहार हा बऱ्याच कुटुंबात घरतील पती म्हणजेच पुरुषांकडे असल्याने सर्व आर्थिक अधिकार पर्यायने सर्व बाबींवर त्यांच्या ताब्यात असल्याने या शेतमजूर स्त्रियांना घरातील पुरुषांप्रमाणे त्यांना वागावे लागते.
(11) बऱ्याच शेतमजूर स्त्रियांच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही आहे. त्यामुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास या शेतमजूर स्त्रियांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. पण तिथे जाण्यासाठी पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे बऱ्याच वेळा या स्त्रियांना दुखणे अंगावर काढावे लागते.
(12) शेतमजूर स्त्रियांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेतले नाही आहे. त्यामुळे त्यांना केवळ शेतमजुरीच्या उत्पन्न्वर अवलंबून राहावे लागते.
(13) घरातील निर्णय प्रक्रियेत या शेतमजूर स्त्रियांचा सहभाग फार कमी स्वरूपाचा असल्याचे दिसून येते. घरामध्ये पुरुषी वर्चस्व असल्याने या स्त्रियांना आपले निर्णय मांडता येत नाही.
(14) बऱ्याच शेतमजूर स्त्रियांना ग्रामसभेविषयी माहिती नाही. त्यामुळे एकूणच परिस्थिती कशी आहे या विषयी या शेतमजूर स्त्रियांना कल्पना येत नाही.
(15) या शेतमजूर स्त्रियांचे शिक्षण अधिक झाले नसल्या कारणाने त्यांना शासनाच्या शेतमजुरांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती कमी स्वरुपात दिसून आली.

शिफारशी:

प्रस्तुत संशोधनाबाबत  शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
(1) शेतमजूर स्त्रियांना आर्थिक प्रश्न नेहमी भेळ सा वत असतात त्यामुळे ग्रामीण भागात शासनाने त्यांना उत्पन्न मिळतील असे प्रकल्प हाती घेण्यात यावे.
(2) ग्रामीण भागात स्त्रियांसाठी विविध जोड व्यावसाय उपलब्ध होतील याकडे लक्ष देण्यात यावे.
(3) या शेतमजूर स्त्रियांना विविध हस्तकौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात यावे. जेणे करून त्या स्वयं रोजगार मिळवण्यावर भर देतील.
(4) ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता निर्माण होईल याकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
(5) शासनाच्या शेती व शेतमजूर यासाठी असणाऱ्या सर्व योजना ग्रामीण भागातील सर्व तळागाळा पर्यंत पोहचतील या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.
(6) ग्रामीण भागात शेतमजुरीचा निश्चित दर होणे आवश्यक आहे. कारण जर निश्चित दर असेल तर शेतमालक त्यांना मजुरीच्या बाबत त्रास देणार नाही. व या स्त्रियांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळेल.
(7) ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारचे गृह उद्योग सुरु करण्यात यावेत. कारण गृह उद्योग असल्यास या शेतमजूर स्त्रियांना शेतमजुरी व्यतिरिक्त इतर उत्पन्नाचे स्त्रोत मिळतील तसेच त्यांच्या कौशल्यास चालना मिळण्यास मदत होईल.
(8) ग्रामसाभेविषयी जाणीव जागृती या भागात होणे आवश्यक आहे. त्यामुळे या शेतमजूर स्त्रियांना आपल्या हक्कांची जाणीव होण्यास मदत होईल.
(9) ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी असणे आवश्यक आहे. कारण विशेषत: स्त्रियांसाठी आरोग्याच्या अनेक समस्या असतात. त्यामुळे गावपातळीवर आरोग्य केंद्र असल्यास त्याचा फायदा या स्त्रियांना होण्यास मदत होते.
(10)  बचतगट , महिला मंडळे याबाबत ग्रामीण भागात जाणीव जागृती निर्माण केल्यास स्त्रियांना संघटीत होण्यास मदत होईल व त्या एकत्र येवून नवीन कौशल्य निर्माण करू शकतील.
(11) ग्रामीण भागात या शेतमजूर स्त्रिया सावकाराकडून कर्ज घेतात व परतफेडीच्या वेळेस सावकार जास्तीचे व्याज घेवून त्यांना त्रास देतात. त्यामुळे ग्रामीण भागातील ही सावकारी बंद करण्यात यावी.
(12) या ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी तर आवश्यक आहेच परंतु शिक्षणाचे फायदे , ते का आवश्यक आहे, स्त्रियांना त्याचा कसा फायदा होतो याविषयी ग्रामीण स्तरावर जाणीव जागृती निर्माण करण्यात यावी.
(13)  ग्रामीण भागात गृह उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदरावर बँकांनी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून या शेतमजूर स्त्रियांना गृह उद्योग सुरु करता येईल व शेतमजुरीच्या व्यतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होईल.
(14)  ग्रामीण भागातील शेतमजूर स्त्रियांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यात यावी. त्यामुळे त्या आपल्या हक्कांसाठी लढतील व आपल्या अधिकारांचा उपयोग चांगल्या प्रकारे उपयोग करतील.
(15)  ग्रामीण भागातील पुरुषांचा  व एकूणच समाजाचा स्त्रियांविषयीचा दृष्टीकोन हा सकारात्मक होणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्त्रियांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.